Rajgurunagar : नोटरी रजिस्टर तपासणीचे काम तालुकास्तरावर विभागून द्या
Rajgurunagar : नोटरी रजिस्टर तपासणीची सुविधा विकेंद्रित करून खेड-राजगुरुनगर, बारामती, दौंड, जुन्नर, शिरूर आणि पिंपरी-चिंचवड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयांमध्ये विभागून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

राजगुरुनगर : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नोटरी वकिलांना वार्षिक रजिस्टर तपासणीसाठी पुणे येथील जिल्हा न्यायालयात जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. ही प्रक्रिया विकेंद्रित करून जिल्ह्यातील स्थानिक व जवळच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयांमध्ये विभागून द्यावी, अशी मागणी नोटरी प्रॅक्टिश्नर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्हा न्यायाधीशांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात नोटरी वकिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व वकिलांना दरवर्षी रजिस्टर तपासणीसाठी पुणे जिल्हा न्यायालयात जावे लागते. या प्रक्रियेला तब्बल तीन महिने लागत असल्याने वकिलांसह संबंधित कामासाठी येणार्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवासासाठी लागणारा वेळ आणि खर्च यामुळे वकिलांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
नोटरी रजिस्टर तपासणीची सुविधा विकेंद्रित करून खेड-राजगुरुनगर, बारामती, दौंड, जुन्नर, शिरूर आणि पिंपरी-चिंचवड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयांमध्ये विभागून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. त्यामुळे संबंधित भागातील नोटरी वकिलांना जवळच्या न्यायालयातच वार्षिक तपासणी पूर्ण करता येईल. परिणामी वेळेची बचत होऊन नागरिकांची गैरसोयही टळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. या मागणीवर पुणे जिल्हा न्यायाधीश कोणता निर्णय घेतात, याकडे जिल्ह्यातील नोटरी वकिलांचे लक्ष लागले आहे.
नोटरी वकिलांना वार्षिक रजिस्टर तपासणीसाठी पुणे जिल्हा न्यायालयात जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. या प्रक्रियेला तीन महिने लागत असल्याने वकील आणि नागरिकांची गैरसोय होते. खेड-राजगुरुनगर, बारामती, दौंड, जुन्नर, शिरूर आणि पिंपरी-चिंचवड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयांमध्ये ही सुविधा विभागून दिल्यास कामकाज जलद आणि सुलभ होईल. न्यायालयावरील कामाचा ताण कमी होऊन ग्रामीण भागातील नोटरी वकिलांनाही दिलासा मिळेल. त्यामुळे जिल्हा न्यायाधीशांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.
-अॅड. दीपक चौधरी, अध्यक्ष, पुणे जिल्हा नोटरी प्रॅक्टिश्नर्स असोसिएशन.





