Mauli Katke: एलिव्हेटेड पुलांसोबत पर्यायी रस्त्यांचाही विकास करा; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली कटके यांची मागणी
Mauli Katke: सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने स्वतंत्र वाहतूक व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्याची सुचना.

Mauli Katke – पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील प्रस्तावित एलिव्हेटेड पुलांची कामे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असली, तरी या कामांच्या कालावधीत नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पर्यायी अंतर्गत रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आमदार माऊली आबा कटके यांनी शासनाकडे केली आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. या महामार्गावरून दररोज हजारो हलकी व जड वाहने प्रवास करतात. शिरूर शहरासह परिसरातील औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्रासाठी हा मार्ग महत्त्वाची जीवनवाहिनी ठरला आहे. वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विविध ठिकाणी एलिव्हेटेड पुलांची उभारणी करण्यात येत आहे.
मात्र, या कामांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले जाणार असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासंदर्भात आमदार माऊली आबा कटके यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, विकासकामे ही काळाची गरज असली तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, याची काळजी घेणे शासनाची जबाबदारी आहे.
पुलांच्या बांधकामादरम्यान वाहतुकीचा भार पर्यायी रस्त्यांवर पडणार असल्याने ते रस्ते सक्षम, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी योग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावांना जोडणार्या अंतर्गत रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण, खड्डेमुक्ती, पावसाळी निचरा व्यवस्था तसेच आवश्यक ठिकाणी वाहतूक चिन्हांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय ठेवून वाहतूक व्यवस्थापनाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, असेही त्यांनी सुचविले. कटके म्हणाले की, अनेकदा मोठ्या विकासकामांमुळे नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. याचा परिणाम विद्यार्थी, व्यावसायिक, कामगार आणि व्यापार्यांवर होतो.
त्यामुळे विकासकामांसोबत वाहतूक व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आगाऊ तयारी करणे गरजेचे आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यातील नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनीही आमदार कटके यांच्या मागणीचे स्वागत केले असून एलिव्हेटेड पुलांच्या कामांदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
“पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील एलिव्हेटेड पुलांची कामे भविष्यासाठी महत्त्वाची आहेत. मात्र, या कामांदरम्यान वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पर्यायी अंतर्गत रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे. विकासकामांसोबत वाहतूक व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करून शासनाने ठोस कृती आराखडा राबवावा.”
– माऊली आबा कटके, आमदार






