माऊली परतूनी आली ! अलंकापुरीत ज्ञानोबा-तुकोबांचा रंगला संत भेट सोहळा

ज्ञानेश्वर फड/एम. डी. पाखरे
आळंदी : माऊली… माऊली… ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष, खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, मृदंग आणि वीणेच्या नादासह, डोईवर तुळशी आणि मुखाने अभंग गात चाललेले वारकरी… रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी, पुढे नगारा आणि मागे माऊलींचा पालखी रथ, त्याच्या मागे-पुढे हजारो वारकऱ्यांचा समुदाय… असा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा आज (रविवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आळंदीत परतला.
आषाढी एकादशीनंतर पौर्णिमेचा गोपाळकाला सोहळा साजरा करून पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेला हा पालखी सोहळा आळंदीत दाखल होताच, आळंदी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी माऊलींचे उत्साहाने स्वागत केले. यंदा विशेष बाब म्हणजे, संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून, संत तुकाराम महाराजांची पालखीही आळंदीत आली. दोन महान संतांच्या पालख्यांचा हा ऐतिहासिक भेट सोहळा हजारो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १० जुलै रोजी पंढरपूर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाला. वाखरी, वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव, वाल्हे, सासवड, हडपसर, पुणे येथे मुक्काम करत हा सोहळा आज आळंदीत पोहोचला. प्रत्येक गावात आणि मार्गावर भाविकांनी माऊलींच्या पालखीचे उत्साहाने स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या, पुष्पवृष्टी आणि भक्तिमय वातावरणाने माऊलींचा परतीचा प्रवास अविस्मरणीय ठरला. पुण्यातून आळंदीकडे येताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी पालखी रथावर फुलांचा वर्षाव केला. अनेक ठिकाणी स्थानिकांनी पालखीचे औक्षण करून स्वागत केले.
गेल्या महिनाभरापासून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी गेलेली माऊली परत आल्याने आळंदीकरांमध्ये नवचैतन्य पसरले होते. आळंदी आणि परिसरातील भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंगांच्या सुमधुर स्वरात आणि पालखी रथाच्या दर्शनाने भाविक भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. अनेकांनी माऊली आणि तुकोबांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करत स्वागत केले. रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या गेल्या, तर काही ठिकाणी भाविकांनी पालखी रथाचे औक्षण केले. दोन्ही संतांच्या भेटीमुळे आळंदीत एक अनोखा उत्साह आणि आनंद पसरला होता.
संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन
यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत आगमन. संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा यानिमित्ताने आळंदी देवस्थानाने देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देऊन तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आणण्याची विनंती केली होती. त्यानुसार, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज माऊलींच्या पालखीच्या आगमनानंतर आळंदीत दाखल झाली. आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांनी तुकोबांच्या पालखीचे जंगी स्वागत केले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुमधुर स्वरात हा सोहळा रंगला. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीत मुक्काम करणार असून, उद्या, दि. २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजता देहूकडे मार्गस्थ होणार आहे.
ऐतिहासिक संत भेट सोहळा
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन महान संतांच्या पालख्यांची भेट हा आळंदीच्या इतिहासातील एक दुर्मीळ आणि पवित्र क्षण ठरला. पूर्वीच्या परंपरेनुसार, संत तुकाराम महाराज आळंदीत माऊलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला जाण्यासाठी मार्गस्थ होत असत. तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला. १६८५ पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून आळंदीत आणल्या जायच्या, आणि नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांसह पंढरपूरला प्रस्थान केले जायचे. मात्र, कालांतराने ही परंपरा खंडित झाली. १८३२ मध्ये गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला, आणि दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगळे झाले. २८ जुलै २००८ मध्ये तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीमध्ये आणण्यात आला होता. त्यानंतर तब्ब्ल १७ वर्षानंतर पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबाराय आळंदीत आला आणि दोन्ही संतांच्या पालख्यांचा हा भेट सोहळा हजारो भाविकांना अनुभवायला मिळाला.





