लहानग्या श्रीमंतची भक्ती, माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी खाऊच्या पैशांचे दान

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंती महोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखरावर ११ किलो सुवर्णाचे कलशारोहण करण्याचा संकल्प सोडला आहे. हा मंगल सोहळा गोकुळअष्टमी, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार आहे. या पवित्र कार्यासाठी सर्व भाविक, भक्त आणि वारकऱ्यांना स्वेच्छेने आर्थिक किंवा वस्तुरूपी सुवर्ण दान देण्याचे आवाहन संस्थान कमिटीने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या कु. श्रीमंत दादासाहेब करांडे या चिमुकल्याने भक्तीला वयाची मर्यादा नसते, हे दाखवून दिले आहे.
आळंदीतील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक धानोरे शाळेत शिकणाऱ्या श्रीमंतने आपल्या मुख्याध्यापक लोखंडे आणि वर्गशिक्षिका शैला गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माऊलींच्या सुवर्ण कलशारोहण कार्यासाठी आपल्या खाऊच्या पैशांची बचत अर्पण केली. दररोज मिळणाऱ्या खाऊच्या पैशांतून थोडे-थोडे पैसे बाजूला ठेवत त्याने ही रक्कम जमवली आणि ती मंदिर समितीकडे सुपूर्द केली. ही रक्कम भले मोठी नसेल, पण त्यामागील भक्ती भाव यामुळे ती अनमोल ठरली आहे.
मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमंतच्या या कृतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “लहान वयातही भक्तीभावाने प्रेरित होऊन योगदान देण्याची वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा कृतीतून भविष्यातील संस्कारी पिढी घडेल.” “माऊली, माझं छोटं अर्पण स्वीकारा,” असे म्हणत लहानग्या श्रीमंतने माऊलींच्या चरणी अर्पण केलेला हा भाव माऊलींनी नक्कीच स्वीकारला असणार. या छोट्या भक्ताच्या कृतीने भक्तीची खरी श्रीमंती मनात असते, पैशात नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. माऊलींच्या सुवर्ण कलशारोहण सोहळ्याला अशा भक्तीमय योगदानामुळे अधिकच पावित्र्य प्राप्त होत आहे.





