नेवासा: कामिका एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या ‘पैस’ खांबाचे दर्शन

नेवासा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव रचनास्थळ असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या ‘पैस’ खांबाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. “पुंडलिक वरदे… हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषाने नेवासा नगरी दुमदुमली.
सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वेदमंत्रांच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य ह.भ.प. देविदासजी महाराज म्हस्के, रामायणाचार्य ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे यांच्या उपस्थितीत पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज डॉ. मेघशाम महाराज गोसावी, ज्ञानराज महाराज गोसावी, राजवर्धन महाराज आणि देवस्थान विश्वस्त कैलास जाधव, प्रतिभा जाधव यांच्या हस्ते ‘पैस’ खांबाला सपत्नीक अभिषेक घालण्यात आला.
आषाढी शुद्ध एकादशीनंतर येणारी कामिका वद्य एकादशी ही माऊलींची एकादशी म्हणून ओळखली जाते. पंढरपूरच्या वारीची पूर्णता या एकादशीला होते, त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व आहे. मंदिर परिसरात दर्शनासाठी एक किलोमीटर लांब रांग लागली होती. मंदिराबाहेर दर्शनबारी आणि मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळासह पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांच्या वतीने भाविकांना ७५ क्विंटल शाबुदाणा खिचडी प्रसादाचे मोफत वाटप करण्यात आले.
मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हॉटेल व्यावसायिक रविराज तलवार, नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्था आणि सुवर्णकार समाज बांधवांनी संत नरहरी महाराज मंदिरात शाबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप केले. स्वप्नील मगर व कुटुंबीयांनी थंड पाण्याचे वाटप केले, तर नेवासाफाटा रस्त्यावर नागेबाबा पतसंस्थेने खिचडी वाटपाची व्यवस्था केली. श्री मोहिनीराज मंदिरासमोर श्री मोहिनीराज भक्त मंडळाने उकडलेले शेंगदाणे आणि चहाचे वाटप केले.
यात्रेनिमित्त देवगड दत्त मंदिर संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख यांनी मंदिराला भेट देऊन ‘पैस’ खांबाचे दर्शन घेतले.
प्रशासनाने यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार डॉ. संजय बिरादार आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड जवान, महिला होमगार्ड आणि स्वयंसेवकांनी निष्काम सेवा दिली. वाहन पार्किंगसाठी जिल्हा परिषद शाळा, ज्ञानोदय हायस्कूल, नाथबाबा विद्यालय आणि नेवासा मार्केट कमिटी प्रांगणात व्यवस्था करण्यात आली होती.
‘पैस’ खांब मंदिराचे जीर्णोद्धारक वैकुंठवाशी ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावरील विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली. नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव येथून शेकडो दिंड्या “ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा गजर करत सहभागी झाल्या. मंदिराचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. देविदासजी महाराज म्हस्के आणि विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंगजी अभंग यांनी दिंडीतील वारकऱ्यांचे श्रीफळ प्रसाद देऊन स्वागत केले.
कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा नगरीत शेकडो दिंड्यांनी “पैस” खांबाचे दर्शन घेतले. सकाळपासूनच रस्त्यांवर दिंडीचा महापूर उसळला होता. युवक-युवतींसह ज्येष्ठ वारकऱ्यांनी धार्मिक वातावरणात सहभाग नोंदवला. दानशूरांनी रस्त्यांवर फराळ, चहा आणि पाण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला.





