Pune District : माऊलींना भक्तिमय वातावरणात निरोप

वाल्हेकरांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत नेली रथापर्यंत
वाल्हे –
भेटी लागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥
पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुरलेले वारकरी भागवत धर्माची पताका उंचावित, टाळ-मृदंग,चिपळ्यांचा नाद करीत,भगवंताला साद घालत,सावळ्या विठोबाच्या दर्शनाची आस मनी धरुन वैष्णवांची मांदयाळी,
हरि नामाचा जयघोष व ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, तुकारामच्या नामघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने गुरूवार (दि. 26) सकाळी साडेसहा वाजता वाल्हे (ता.पुरंदर) येथून पुढील मुक्कामासाठी लोणंदकडे प्रस्थान ठेवले.
सकाळच्या मंगलमय वातावरण, रिमझीम पावसांच्या सरी झेलत लाखो वैष्णवांसह ग्रामस्थांनी हरिनामाचा गजर केला. माऊलींच्या अश्वाने सकाळी साडेसहा वाजता पालखीचे दर्शन घेतल्यानंतर लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतली.
यावेळी ज्ञानोबा माऊली, तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम नामाचा अखंड जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी,वाल्हेकर ग्रामस्थांनी पालखीला खांदा देऊन निरोप दिला.





