Indrayani River: इंद्रायणी नदीला महापूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Indrayani River: पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांची पावसामुळे तारांबळ

Indrayani River: पुणे जिल्हा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलसंपदा विभागाने इंद्रायणी आणि सुधा नदीकाठच्या गावांना तीव्र सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सद्यस्थितीचा पाऊस आणि धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मावळ तालुक्यातील जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव १००% भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास कोणत्याही क्षणी नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग सुरू होऊ शकतो, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली आहे.
तसेच मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू – आळंदी ते तुळापूर पर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना नदीपात्रालगत जाऊ नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. प्रशासनाने इंद्रायणी आणि सुधा नदीच्या खोऱ्यातील खालील गावांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः पायी दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने देहू-आळंदी येथे आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रामध्ये न जाण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायत, नगर पालिका व महापालिका यांना इंद्रायणी नदी अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
4 पूल वाहतुकीसाठी बंद
याशिवाय गेल्या 4 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे. त्यामुळे आळंदीतील सर्व 4 पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच आळंदी नगरपरिषद प्रशासनाने नागरिक, भाविकांना इंद्रायणी पात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी पहाटेपासून आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल, सिद्धबेट परिसरातील पूल व पीएमपीएल बस स्थानकाशेजारील नवीन पूल असे चारही पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढीवारीसाठी बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे.
तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नका. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा:






