Europe heatwave : दक्षिण युरोपात उष्णणतेची प्रचंड लाट

पॅरिस – युरोपातल्या दक्षिणेकडील देशांमध्ये सध्या उष्णतेची प्रचंड लाट आली असून तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त झाल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होते आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना काही देशांमध्ये प्रशासनाने नागरिकांना दिली आहे.
फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल आणि ग्रीस या देशांमध्ये असह्य उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे ग्रीसमध्ये भडकलेला वणवा अजूनही पुर्णपणे आटोक्यात आलेला नाही. यावणव्यामुळे शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागलेले आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये तापमान ४१अंश इतके नोंदवले गेले आहे. या उष्णतेमुळे पर्यटकांनाही उष्माघाताचा त्रास संभवू शकतो. यामुळे ठिकठिकाणी रुग्णवाहिका उष्माघात होणाऱ्यांना रुग्णालयात नेण्यासाठी सज्ज ठेवल्या गेल्या आहेत.
इटलीमध्येही सोमवारी उष्णतेमुळे जंगलात आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशामक विभाग सक्रिय आहे. या आगीमध्ये ९८८ एकर इतक्या शेतजमिनीवरचे पीक जळून गेले आहे. ही आग एका शेकोटीमुळे पसरल्याचे नंतर लक्षात आले. देशातील तुरुंगातल्या कैद्यांना प्रचंड उष्णतेपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
शनिवारी स्पेनच्या दत्क्षिणेकडील भागात ४६ अंश इतके तापमान नोंदवले गेले. जून महिन्यात नोंदवले गेलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. पोर्तुगालमधील मोरा या ठिकाणीही सोमवारी ४६ अंश तापमान नोंदवले गेले. राजधानी लिस्बनसह ७ भागांना रेड अलर्ट देण्यात आला असून बऱ्याच भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हा रेड अलर्ट अजूनही लागू आहे.
प्रचंड उष्णतेमुळे पॅरिसमधील १,३५० शाळा अंशतः किंवा पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंद ठेवायच्या शाळांची ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. क्रोएशियाच्या किनारपट्टीच्या भागातही रेड अल्ट देण्यात आला आहे.
सर्बियामध्येही अशीच परिस्थिती असून यामुळे देशात यावर्षी दुष्काळ पडण्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे. ब्रिटनच्या उत्तरेकडील ७ भागांमध्ये अंबर अलर्ट जारी करण्यात आला असून तेथे तापमान ३४ अंशांइतके नोंदवले गेले आहे. वातावरण बदलाच्या परिणामांमुळे ही तापमानवाढ होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.





