राजकोट – गुजरातमधील राजकोट शहरातील एका बहुमजली निवासी इमारतीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला. तसेच सुमारे ४० रहिवाशांना वाचवण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. कल्पेश लेउवा आणि मयूर लेउवा अशी मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ही आग अटलांटिस अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्ने केले. आज धूलिवंदनाची सुटी असल्याने इमारतीमधील रहिवासी हे फ्लॅटमध्येच होते. इमारतीमध्ये आग लागल्याचे कळताच रहिवासी घाबरले. यानंतर लिफ्टकडे धाव घेत अनेकजण खाली पोहोचले. त्यानंतर या घटनेची माहिती ही अग्निशमन विभाग आणि पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक शर्यतीचे प्रयत्न करून दुपारी २ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. या इमारतीमध्ये ज्वेलर्स दुकानाचे मालक तसेच नामवंत डॉक्टरांचे कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. आग नेमकी कशी लागली याचा तपास केला जाईल. मात्र, आगीच्या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.