मुंबई : मुंबईतील मस्जिद बंदर परिसरातील ११ मजली इमारतीला लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. साबीला खातून शेख (वय-४२) आणि साजीया आलम शेख (वय-३०) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहे. नेमकं काय घडलं? दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर परिसरातील पन्ना अली मॅन्शन या इमारतीत ही आग लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कॉमन पॅसेजमध्ये बसवलेल्या मीटर बॉक्समध्ये इलेक्ट्रीक वायरिंगला ही आग लागली होती. या आगीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कॉमन पॅसेजमधील दोन महिलांना हात आणि पायांना दुखापत झाली. तसेच आगीनंतर पसरलेल्या धुरामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रासही झाला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेला एक व्यक्ती आणि आठव्या मजल्यावरील एका महिलेला या घटनेत गुदमरल्याचा त्रासाला सामोरे जावे लागले. यानंतर करिम शेख (वय-२०) आण शाहिन शेख (वय-२२) यांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल माहिती मिळू शकली नाही.