कौशांबीतील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

कौशांबी – उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील महेवा गावात रविवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली.
या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेवा गावातील फटाक्यांच्या कारखान्यात दुपारी बाराच्या सुमारास अचानक स्फोट झाला.
हा स्फोट एवढा मोठा होता की, कारखान्यापासून अनेक किलोमिटर त्याचा आवाज ऐकू आला. या स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग लागली. त्यात कारखान्याच्या मालकासह सात जणांचा मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव म्हणाले, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
सध्या आगीवर जवळपास नियंत्रण मिळवण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




