Karad News: ‘मास्क’ घातलेल्या चोरट्यांनी घरे फोडली, अपार्टमेंटमध्ये घुसून धुमाकूळ
Karad News: चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज 'व्हायरल'

संजय पाटील
कराड – कराड तालुक्यातील मुंढे गावात तब्बल ५ ते ६ बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. साई विश्व अपार्टमेंट आणि साईराम गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरातील घरांमध्ये चोरट्यानी घरफोडी करुन किमती ऐवज लंपास केला आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तोंडाला मास्क बांधलेले आणि हातात ग्लोव्हज घातलेले तीन ते चार संशयित चोरटे दिसून येत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोरटे अतिशय सावधपणे परिसरात वावरताना दिसत असून, घरफोडी करण्यापूर्वी त्यांनी परिसराची पाहणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बंद घरे हेरून त्यांना लक्ष्य करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान
सध्या या घटनेतील सर्वात महत्त्वाचा धागा म्हणजे समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज. मास्क आणि ग्लोव्हजमुळे चोरट्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान असले, तरी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंढे गावातील या घरफोडीच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





