‘या’ देशात लसीकरणानंतर उठवली ‘मास्क’सक्ती; आता 24 तासांत आढळतात लाखावर रूग्ण

वॉशिंग्टन – करोना बाधितांची संख्या घटत असल्यामुळे आणि स्थिती आटोक्यात आल्यामुळे गेल्या काही काळात अमेरिकेने थोडे निर्बंध शिथिल केले होते. त्यात मास्कमधूनही तेथील नागरिकांची सशर्त सुटका झाली होती. मात्र चीननंतर अमेरिकेतही रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अमेरिका सावध झाली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत एक लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जवळपास अर्ध्या लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होऊनही ही परिस्थिती असल्याचे पाहून सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) लसीकरण झालेल्या लोकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
मास्क सक्तीमध्ये शिथिलता दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये अमेरिका पुन्हा सर्वाधिक करोना रुग्णसंख्या असलेला देश झाला आहे. अमेरिकेत 49.7 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण होऊनही ही स्थिती आहे.
करोना प्रतिबंधक लसीकरणात अमेरिका आघाडीवर आहे. भारतात केवळ 7 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस) झालं आहे. अमेरिकेतली सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने शाळकरी मुलं, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
मागील 24 तासांत फ्लोरिडामध्ये 38,321 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. टेक्सासमध्ये 8,642, कॅलिफोर्नियात 7,731, लुईसियानात 6,818, जॉर्जियात 3,587, यूटाहमध्ये 2,882, अलाबामात 2,667 आणि मिसौरीत 2,414 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.





