Masap Election Result : ‘मसाप’ निवडणुकीचा निकाल जाहीर! ४५ मतांच्या फरकाने घडला इतिहास; पाहा विजयी उमेदवारांची यादी
Masap Election Result : दहा वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत मतदारांचा मोठा कौल; साहित्य संवर्धन आघाडीने प्रमुख पदांवर मिळवले यश.

Masap Election Result – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद रविवारी (दि. १५) लागलेल्या निवडणूक निकालात सत्तापालट झाल्याचे पाहायला मिळाले. साहित्य संवर्धन आघाडीने साहित्य परिषदेच्या प्रमुख पदांवर विजय मिळवत सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलचा पराभव केला. परिषदेच्या अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण विजयी झाले. प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक, तर कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर विजयी झाले.
मसापच्या ३१ पैकी २४ जागांवर विद्यमान सदस्य निवडून आले, तर ७ जागा विरोधी पॅनेलला मिळाल्या. मतमोजणीत परिवर्तन उत्कर्ष आणि साहित्य संवर्धन या दोन पॅनेलमध्ये अखेरपर्यंत चुरस पहायला मिळाली. मसापच्या पदाधिकाऱ्यांनी २०२१ मध्ये करोनाचे कारण देऊन पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. त्यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती.
सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधी पदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. सुरुवातीपासून साहित्य संवर्धन आघाडीचे वर्चस्व मतमोजणीत दिसून आले. मात्र,शेवटी साहित्य संवर्धन आघाडीने वर्चस्व मिळवत सत्ताधाऱ्यांना धक्का देत विजयोत्सव साजरा केला. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत योगेश सोमण विरुद्ध प्रा. मिलिंद जोशी अशी चुरस होती. जोशी यांना ५ हजार ३२०, तर सोमण यांना ५ हजार ६६५ मते मिळाली.
४५ मताधिक्य मिळवत सोमण यांनी विजय मिळवला. प्रमुख कार्यवाह पदासाठी स्वाती महाळंक यांना ५ हजार ४४१, तर सुनीताराजे पवार यांना ५ हजार २८५ मते मिळाले. महाळंक या १२९ मताधिक्याने विजयी झाल्या. कोषाध्यक्ष पदासाठी प्रदीप निफाडकर यांना ५ हजार ५३६ आणि विनोद कुलकर्णी यांना ५ हजार १६८ मते मिळाली. त्यामध्ये निफाडकर सर्वाधिक ३६८ मताधिक्य घेऊन विजयी झाले.
निवडून आलेले उमेदवार Masap Election Result
अध्यक्ष : योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह : स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष : प्रदीप निफाडकर
स्थानिक कार्यवाह : सुनील महाजन, अंजली कुलकर्णी, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, माधव राजगुरू, नितीन संगमनेरकर, आशुतोष जावडेकर
“साहित्य परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. सर्व आजीव सभासदांनी भरभरून मतदान केले. साहित्यप्रेमीचा चांगला पाठिंबा मिळाला. निवडणुकीत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे आभार.”
– योगेश सोमण, नवनिर्वाचित अध्यक्ष, मसाप






