Pune : आख्यानकाव्ये म्हणजे परस्परांना जोडणारी भाषिक परिसंस्था – डॉ. रमेश वरखेडे
Pune : आख्यानकाव्ये केवळ इतिहासातील स्मारके नसून परंपरा आणि विचारांना जोडणारी जिवंत भाषिक परिसंस्था आहेत, असे डॉ. रमेश वरखेडे यांनी सांगितले.

Pune : पारंपरिक आख्यानकाव्यांकडे केवळ इतिहासातील स्मारके किंवा अस्मितेची साधने म्हणून पाहता येणार नाही. ही काव्ये आजही जिवंत असून विविध परंपरा, विचार आणि लोकसंस्कृतीला जोडणारी भाषिक परिसंस्था आहेत, असे मत ज्येष्ठ समीक्षक व भाषातज्ज्ञ डॉ. रमेश वरखेडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित आणि ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे संपादित ‘शिवशक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’ या ग्रंथावर आयोजित परिचर्चेत ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात १९ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.
लोकसंस्कृतीची ज्ञानपरंपरा, शैव-शाक्त तत्त्वज्ञानाचे लोकजीवनातील रूप आणि भारतीय सांस्कृतिक एकात्मता समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा असल्याचे डॉ. वरखेडे यांनी सांगितले. या ग्रंथामुळे लोकसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, वैदिक वाङ्मय आणि लोकवाङ्मय यांच्यात संत साहित्याने महत्त्वाचा दुवा निर्माण केला. संतांना लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीतील घटकांविषयी आदर होता. त्यामुळे त्यांनी भारुडासारख्या लोकाभिमुख रचना केल्या. लोकवाङ्मय आणि संतवाङ्मयातील संबंधांचा अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच शक्ती संप्रदायातील समकालीन संदर्भ शोधून त्यावर कलगीतुऱ्याच्या परंपरेपलीकडेही लेखन व्हायला हवे.
प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांनी शिवशक्ती संप्रदायातील परस्पर संवादाची प्रक्रिया स्पष्ट केली. संत एकनाथ महाराजांनी भारुडे आणि गवळणींच्या माध्यमातून हा संवाद भक्तीच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचवला, असे त्यांनी सांगितले.
डॉ. मुकुंद कुळे यांनी लोकगीतांमधून व्यक्त झालेल्या मानवी संवेदना आणि शिवशक्ती संप्रदायाच्या लोक-गान परंपरेतील संबंध उलगडले. प्रसिद्ध तुरेवाले बबनराव चौरे यांनी ज्ञान आणि भक्ती यांचा लोकपरंपरेतून झालेला प्रसार स्पष्ट केला. त्यांनी शिवशक्ती संप्रदायातील गुह्य ज्ञान आणि ‘हंस ध्वनी’ याविषयीही माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले, तर आभार डॉ. सुखदा खांडगे-खैर यांनी मानले.





