Maharashtra Sahitya Parishad : साहित्य परिषदेच्या निवडणुकीत खळबळ; ‘या’ उमेदवाराविरोधात तक्रार दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?
Maharashtra Sahitya Parishad : २६ जानेवारीच्या ऑनलाईन बैठकीचा व्हिडिओ ठरला वादाचे मूळ

Maharashtra Sahitya Parishad – साहित्य परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. साहित्य संवर्धन आघाडीच्या खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित केल्याप्रकरणी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आणि मानहानी केल्याचा आरोप बैठकीच्या आयोजकांनी केला आहे.राजेंद्र लखीचंद नन्नावरे (वय ५६, रा. जळगाव) यांनी तक्रार दिली आहे.तक्रारदारांच्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार नियोजनासाठी खासगी ऑनलाईन बैठक आयोजित केली होती.
बैठकीच्या रेकॉर्डिंगसाठी कोणतीही संमती दिली नव्हती. मात्र, विनोद कुलकर्णी यांनी गुपचूप रेकॉर्डिंग केल्याने गोपनीयतेचा भंग झाला. त्यानंतर कुलकर्णी यांनी या रेकॉर्डिंगचा वापर करून पुण्यात पत्रकार परिषद घेत खोटी, बदनामीकारक विधाने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या अनधिकृत रेकॉर्डिंगचा आधार घेत माझ्या विरोधात चुकीची आणि बदनामीकारक विधाने केली आहेत. यामुळे माझ्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे, असे तक्रारदारांनी अर्जात नमूद केले आहे.
“महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी भाषेतील साहित्य संवर्धनाविषयी उहापोह होणे अपेक्षित आहे. याच प्रकारचा प्रचार साहित्य प्रेमी मतदारांना अपेक्षित आहे. परंतु विरोधक उणीदुणी काढत, यात राजकारण आणत आहेत.”
– राजेश पांडे





