Masap Election 2026 : “निवडणूक मूळ मुद्द्यापासून दूर नेण्याचा डाव!”; विनोद कुलकर्णी यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Masap Election 2026 : मराठी वाड्मयाचा इतिहास आणि भव्य १०० वे संमेलन; विनोद कुलकर्णी यांच्या आघाडीचा महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसिद्ध.

Masap Election 2026 – न्यायालयीन लढाई हा विरोधकांचा डाव असून यात परिषदेला विनाकारण गुंतवून निवडणूक मूळ मुद्द्यापासून दूर न्यायची आहे. दुसऱ्याच्या त्रुटी दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत. उच्च न्यायालयात आमच्या बाजूने लागलेला निकाल हा विरोधकांसाठी मोठी चपराक आहे. आता आजीव सभासद नसलेल्या एकाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असले तरी,
तेथेही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाला न्याय मिळेल, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.मसापच्या विद्यामान कार्यकारणीने स्थापन केलेल्या या आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला.
तसेच भविष्यातील योजनांची माहितीही दिली. यात १०० वे साहित्य संमेलन भव्य स्वरूपात साजरा करणे, मराठी वाड्मयाच्या इतिहासाच्या आठव्या खंडाच्या प्रकल्प सुरू करणे, शाखांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य करणे, स्वतंत्र अनुवाद विभाग आणि कौशल्य अभ्यासक्रम सुरू करणे, पुण्यात दरवर्षी फक्त मराठी पुस्तक महोत्सव भरवणे, समकालीन पुस्तकांवर चर्चासत्र आदी आश्वासने दिली आहेत.
ते म्हणाले, विरोधी पॅनलमधील एकही उमेदवार गेल्या दहा वर्षात साहित्य परिषद एकाही वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित नाही. ही मंडळी परिषदेतील कार्यक्रमालाही कधी दिसली नाहीत. साहित्य बाह्य शक्तींचा पाठिंबा मिळाल्यामुळे आता त्यांना साहित्य परिषदेचा पुळका आला आहे. अशा संधीसाधू मंडळींना साहित्यिक, आजीव सभासद अजिबात थारा देणार नाहीत.





