Maruti Chitampally : अरण्यऋषी, ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे निधन

Maruti Chitampally : ज्येष्ठ लेखक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचं सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (ता.18) निधन झालं आहे. गेल्या 30 मार्चला त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांना त्यांच्या जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतानाच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी पक्षी कोष तयार करायला देखील स्वत:ला वाहून घेतले होते. एका ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा सन्मान यंदा पद्म पुरस्कारानं करण्यात आला होता.
मारुती चितमपल्ली यांचा परिचय :
जन्म – ५ नोव्हेंबर १९३२, सोलापूर, शिक्षण – सोलापूर येथील दयानंद कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण करून पुढील व्यावसायिक शिक्षण कोइमतूर फॉरेस्ट कॉलेज, बंगलोर, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (म.प्र.), डेहराडून वगैरे ठिकाणच्या वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले.
नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत, तसेच पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं. गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे, वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन. जर्मन आणि रशियन भाषांचे अध्ययन. पक्षितज्ज्ञ म्हणून ख्यातिप्राप्त. वन्यजीव व्यवस्थापन, वन्यप्राणी आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन. आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग आणि निबंधवाचन.
जीविका – महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य करीत उपसंचालक पदावरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून १९९० साली सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव योगदान.
सेवाकाळ आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्यांत सक्रिय सहभाग, डॉ. सालीम अली वन्यप्राणी संस्थेचे संस्थापक सचिव. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद) यांचे सदस्य होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी कार्य पाहिले.
प्रकाशित साहित्य :
०१. पक्षी जाय दिगंतरा – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (१९८३)
०२. जंगलाचं देणं – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (१९८५)
०३. रानवाटा – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (१९९१)
०४. शब्दांचं धन – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (१९९३)
०५. रातवा – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (१९९३)
०६. मृगपक्षिशास्त्र – महाराष्ट्र राज्य साहित्य व (संस्कृत-मराठी अनुवाद) संस्कृती मंडळ, मुंबई (१९९३)
०७. घरट्यापलीकडे – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (१९९५)
०८. पाखरमाया – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (२०००)
०९. निसर्गवाचन – पद्मगंधा प्रकाशन, पुणे (२०००)
१०. सुवर्णगरुड – साहित्य प्रसार केंद्र, नागपूर (२०००)
पुरस्कार :
०१. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, जंगलाचं देणं (१९८९)
०२. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, रानवाटा (१९९१)
०३. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, रातवा (१९९४)
०४. विदर्भ साहित्य संघ पुरस्कार, जंगलाचं देणं (१९९१)
०५. भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार, रानवाटा (१९९१)
०६. मृण्मयी साहित्य पुरस्कार, रानवाटा (१९९१)
०७. फाय फाउंडेशन, इचलकरंजी या प्रतिष्ठानद्वारा १९९१ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
०८. साहित्य सैवेच्या सन्मानार्थ १४ जानेवारी १९९९ रोजी विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्याकडून ‘साहित्य वाचस्पती’ (डी. लिट्. समकक्ष) पदवी प्राप्त.
०९. शिव-गिरिजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डुवाडी पक्षिकोश (१२ जाने. ०३)
१०. विदर्भ साहित्य संघाचा – जीवनव्रती पुरस्कार ( १४ जाने. ०३ )
११. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार (४ जाने. ०४)
१२. महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य गौरव पुरस्कार (२७ डिसें. ०३)
१३. पुणे मराठी ग्रंथालय सन्मान व साहित्य पुरस्कार (२६ ऑक्टो. ०४)
१४. सारथी संस्था, नागपूर यांच्याकडून उत्कृष्ट निसर्ग साहित्यनिर्मितीबद्दल स्क्रोल ऑफ ऑनर (२ जाने. ०४)
१५. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार (१४ जाने. ०५)
१६. मानव मंदिर, नागपूर, स्व. स्मिता पाटील पुरस्कार (१४ डिसेंबर २००५)
१७. इंदिरा संत उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार – ‘चकवाचांदण: एक वनोपनिषद’ आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी ( १२ जुलै २००६)
१८. मेन अॅनिमल अलाइज फाउंडेशन – वेणू मेनन लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवार्ड (राष्ट्रीय) (१९ फेब्रु. २००७)
१९. नागभूषण अवार्ड फाउंडेशन यांचा नागभूषण पुरस्कार (२५ मार्च २००८)





