नांदेडमध्ये ऑनर किलिंग..! बापाने विवाहित मुलीसह प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक भयानक ऑनर किलिंग प्रकरण समोर आलं आहे. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे एका विवाहित मुलीने तिच्या प्रियकराला सासरी बोलावलं, पण सासरच्या मंडळींनी त्यांना पकडलं आणि मुलीच्या वडिलांना सूचना दिली. संतापलेल्या वडिलांनी दोघांनाही गावी आणून मारहाण केली आणि हात-पाय बांधून 40 फूट खोल विहिरीत फेकून दिलं. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली.
आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी वडिलांसह काका आणि आजोबांना अटक केली आहे, तर प्रियकराच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोरजुन्नी गावची रहिवासी संजीवनी कमळे (वय 19, मूळ नाव सुरणे) हिचे गेल्या वर्षी गोळेगाव येथील सुधाकर कमळे याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न झालेली आहे. बोरजुन्नी आणि गोळेगाव ही दोन गावे शेजारीच आहेत. लग्नापूर्वी संजीवनीचा लखन बालाजी भंडारे (वय 19) याच्याशी दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण चालू होतं. लग्नानंतरही दोघे फोनवर संपर्कात राहिले आणि प्रेमसंबंध कायम ठेवले.
सोमवारी (25 ऑगस्ट) संजीवनीच्या सासरच्या मंडळी घराबाहेर असताना तिने लखनला सासरी बोलावलं. दोघे एकत्र असताना संजीवनीचा नवरा आणि सासरचे इतर सदस्य घरी परतले आणि त्यांना संशयास्पद स्थितीत पाहिलं. संतापलेल्या सासरच्या मंडळींनी संजीवनीच्या वडिलांना फोन करून तिला घेऊन जाण्यास सांगितलं. संजीवनीचे वडील मारोती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिथे पोहोचले. त्यांनी संजीवनीला घेऊन गावी परतले आणि लखनलाही सोबत नेलं.
गावातील करकाळा शिवारात पोहोचल्यानंतर संतप्त मारोती सुरणे यांनी दोघांनाही प्रथम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून 40 फूट खोल विहिरीत फेकून दिलं. पाण्यात बुडून संजीवनी आणि लखनचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि गावकऱ्यांनी संजीवनीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला, पण लखनचा मृतदेह रात्रीपर्यंत सापडला नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर मारोती सुरणे स्वतः उमरी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी घटनेची नोंद घेत मारोती सुरणे, माधव सुरणे आणि लक्ष्मण सुरणे यांना अटक केली आहे. संजीवनीचा नवरा सुधाकर कमळे यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. लखनच्या वडिलांनी सांगितलं की, “मुलीने लखनला फोन करून बोलावलं होतं. तिथे गेल्यानंतर त्याला पकडलं. त्यानंतर आम्हाला फोन आला की, ‘तुमच्या माणसांना घेऊन या, मिटवून टाकू’. आम्ही निघालो, पण त्याआधीच लखन गायब झाला होता.” पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत





