Marriage Problem: तरुणांना लग्नासाठी द्यावा लागतोय हुंडा; एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून फसवणूक, आमदार सोळंकेंनी विधानसभेत मांडली व्यथा
Marriage Problem: आमदार सोळंके म्हणाले, "मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या खेडेगावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत, ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेले नाही.

Marriage Problem: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विधानसभेत महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी होणाऱ्या प्रचंड अडचणी, फसवणुकीचे वाढते प्रकार आणि त्यामुळे तरुण व्यसनाधीन होण्याच्या समस्येवर सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
खेड्यापाड्यात ५० ते १०० तरुण अविवाहित –
आमदार सोळंके म्हणाले, “मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या खेडेगावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत, ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेले नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे हे तरुण शेतीचा व्यवसाय करतात. आज ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला कुणीही तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.”
आता मुलाच्या घरून द्यावा लागतो हुंडा –
पूर्वी मुलींकडून हुंडा घेतला जात असे, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलटी झाल्याचे सोळंके यांनी सांगितले. लग्नासाठी मुलगी मिळवण्यासाठी आता मुलाच्या कुटुंबालाच मुलीच्या घरी हुंडा द्यावा लागत आहे. या हतबलतेचा फायदा घेऊन मोठे फसवणुकीचे रॅकेट सक्रिय झाले आहे. बोगस मुली आणून विवाह लावले जातात, अडीच ते तीन लाख रुपये उकळले जातात आणि धक्कादायक म्हणजे एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून तरुणांना लुटण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
नैराश्यातून तरुण व्यसनाधीन होण्याचा धोका –
लग्नाची वणवण आणि समाजात मिळणारी वागणूक यामुळे ग्रामीण भागातील अविवाहित तरुण मोठ्या प्रमाणावर नैराश्यात जात असल्याची चिंताही सोळंके यांनी व्यक्त केली. “लग्न होत नसल्याने अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे. अशा तरुणांसाठी सरकार काही विशेष योजना किंवा मदत करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारची सकारात्मक ग्वाही –
आमदार सोळंके यांनी मांडलेली ही वस्तुस्थिती राज्य सरकारने गांभीर्याने घेतली. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले की, “आमदार सोळंके यांनी मांडलेली माहिती वर्तमान परिस्थितीचे वास्तव चित्र आहे. शासन या बाबीची गंभीर दखल घेणार असून संबंधित सूचनांचा अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना आणि योजना तयार करण्याबाबत विचार केला जाईल.”





