US Open 2024 : विम्बल्डन चॅम्पियन मार्केटा वोंड्रोसोवाची यूएस ओपनमधून माघार, समोर आलं ‘हे’ कारण….

US Open 2024 (Marketa Vondrousova) : – सन 2023 ची विम्बल्डन विजेती चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवाने दुखापतीमुळे युएस ओपनमधून माघार घेतली आहे. 25 वर्षीय वोंड्रोसोवाने 2019 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत उपविजेतेपद होते. त्यानंतर 2021 साली झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्यपदाला गवसणी घातली होती.
गतवर्षी झालेल्या विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना वोंड्रोसोवाने सनसनाटी निर्माण केली होती. जुलैमध्ये ऑल इंग्लंड क्लबमध्ये पहिल्या फेरीतील पराभवानंतर ती खेळलेली नाही. वोंड्रोसोवाच्या माघारीनंतर पेट्रा मार्टिकचा समावेश महिलांच्या ड्रॉमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन वेळची यूएस ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका आणि इतर तीन माजी विजेते स्टॅन वावरिंका, डॉमिनिक थिम आणि बियान्का अँड्रीस्कू यांना येत्या 26 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वर्षातील अंतिम ग्रँड स्लॅमसाठी वाइल्ड कार्ड देण्यात आले आहे.
याशिवाय महिला गटात अमांडा ॲनिसिमोवा, मॅककार्टनी केसलर, अलेक्सा नोएल आणि इवा जोविक यांच्याशिवाय फ्रान्सच्या क्लो पॅक्वेट आणि ऑस्ट्रेलियाच्या टायला प्रेस्टन यांनाही वाईल्ड कार्ड देण्यात आले आहे. वाइल्ड कार्ड मिळालेल्या पुरुष खेळाडूंमध्ये अमेरिकेचे ख्रिस युबँक, लर्नर टिएन, झॅचरी स्वजदा आणि मॅथ्यू फोर्ब्स तसेच फ्रान्सचे अलेक्झांड्रे मुलर आणि ऑस्ट्रेलियन ट्रिस्टन स्कुलकेट यांचा समावेश आहे.





