IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला स्टार खेळाडू मुकणार

Mark Wood ruled out of Test series against India : आयपीएलच्या १८व्या हंगामाला २२ मार्चपासून केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्याने सुरुवात होणार आहे. या जगप्रसिद्ध टी-२० लीगचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे. यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लडचा दौरा करणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीने या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही.
मार्क वूडच्या गुडघ्यावर झालीय शस्त्रक्रिया –
मार्क वूडच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो पुढील चार महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहणार आहे. जूनमध्ये भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे,त्यातही मार्क वूड इंग्लंडकडून खेळू शकणार नाही. ही इंग्लंडसाठी चांगली बातमी नाही. ईएसपीएन क्रिकइंन्फोच्या रिपोर्टनुसार,मार्क वूडच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर तो मैदानावर परतला, तरीही तो त्याचा स्पेल पूर्ण करु शकला नाही.
मार्क वूड अॅशेस मालिकेसाठी परतू शकतो –
भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर इंग्लंड क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका खेळेल. ही मालिका नोव्हेंबरमध्ये होईल आणि यावेळी अॅशेसचे आयोजन करण्याची पाळी ऑस्ट्रेलियाची आहे. तोपर्यंतच मार्क वूड बरा होऊ शकेल असे मानले जाते. असो, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी मालिका म्हणजे अॅशेस. ही मालिका दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे.
मार्क वूडची आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिलीय?
मार्क वूड सतत दुखापतींशी झुंजत आहे. २०१५ मध्ये संघासाठी पदार्पण करणारा मार्क वूड सातत्याने दुखापतींना तोंड देत आहे. इंग्लंडसाठी ३७ कसोटी सामने खेळणाऱ्या मार्क वूडने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये ११९ विकेट्स घेतल्या आहेत. जर एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे, तर त्याने ७० एकदिवसीय सामन्यात ८० विकेट्स घेतल्या आहेत.





