पुणे | उत्पादन शुल्क कार्यालयावर धंगेकर, अंधारे यांचा मोर्चा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहर व ग्रामीण भागात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या पबविरोधात आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. दोन्ही नेत्यांनी उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना धारेवर धरले. तसेच प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली.
या आंदोलनावेळी माजी आमदार मोहन जोशी, शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार धंगेकर यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्याना खोट्या नोटा भरलेल्या बॉक्स भेट दिला.
यावेळी धंगेकर यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. “तुम्ही पुणे उद्ध्वस्त केले आहे. तुम्ही दर महिन्याला ७० ते ८० लाख रु. हप्ता घेता, हफ्ता देणाऱ्यांची नावे माझ्याकडे आहे?, असे आरोप करत धंगेकर यांनी काही अधिकाऱ्यांची नावे देखील वाचून दाखवली.
यासह काही खासगी व्यक्ती देखील वसुलीचे काम करतात, असेही धंगेकर म्हणाले. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल, तर तुम्ही एक पत्रादेखील टाकू शकत नाही, मग शहरातील पब पहाटे चार वाजेपर्यंत कसे चालतात? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे बोलणार नाही, असा इशारा धंगेकर यांनी दिला.





