Pune : अभ्यासासाठी नेमलेल्या आयोगात भ्रष्टाचार : अंधारे

पुणे : राज्य शासन मराठा समाजाची फसवणूक करत असून, मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या आयोगात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या अभ्यासासाठी आयोगाची स्थापना करून बहुजन कल्याण विभागाने कामकाजासाठी सुमारे ३६७ कोटी १२ लाख ५९ हजार रुपयांची तरतूद केली. मात्र, आयोगाने प्रत्यक्ष केलेला खर्च आणि मंजूर निधीत तफावत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
पुण्यात पाच हजार स्क्वेअर फूट जागा कार्यालयीन वापरासाठी भाड्याने घेण्याचा खर्च 3 कोटी 75 लाख दाखवला आहे. वास्तविक एवढ्या पैशांत तेवढी जागा विकत घेऊन बांधकाम करता येऊ शकते, असेही अंधारे या वेळी म्हणाल्या. आयोगाच्या आर्थिक अनियमिततेबाबत यापूर्वीच एक अधिकारी व एक सदस्यांनी शासनाला पत्र लिहिले असल्याचे अंधारे यांनी सांगितले.





