पुणे – रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रिक्षा पंचायतीच्या मागण्यांचा विधानसभेत पाठपुरावा करणार आहे. त्यांच्या प्रश्नांवर शासन दरबारी प्राधान्याने आवाज उठवणार, असे आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे काॅंग्रेस – महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली. धंगेकर यांनी शनिवारी कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत त्यांचे आशीर्वाद घेतले. रिक्षा पंचायतीचे ओंकार मोरे, रमेश उणेचा, शफिक पटेल, अर्जुन लोखंडे, विजया रांजणे, मधुकर यादव, राहुल व्यास उपस्थित होते. डॉ. आढाव यांनी हमाल, रिक्षाचालक तसेच अन्य कष्टकरी वर्गाचा आवाज बुलंद करून शासन दरबारी त्यांच्या अनेक प्रश्नांची तड लावली आहे. बाबांच्या प्रयत्नांमुळे अनेक कष्टकऱ्यांना आता जगणे बऱ्याच अंशी सुसह्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाची आहे, अशी भावना यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केली. रिक्षापंचातीने मांडला मागण्यांचा जाहीरनामा यावेळी रिक्षा पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून रिक्षाचालकांच्या मागण्यांचा जाहीरनामा सादर करण्यात आला. त्यात त्यात रिक्षाचा मुक्त परवाना त्वरित बंद करणे, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ शासनाचे महामंडळ करणे व ते स्वावलंबी होण्यासाठीची तरतूद करणारे नियम तयार करणे, बाइक टॅक्सीला राज्याच्या केवळ दुर्गम भागांतच परवानगी देणे, ई रिक्षाला ऑटो रिक्षा प्रमाणेच परवाना आणि इतर नियम लागू करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा आपण शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही धंगेकर यांनी दिली.