Devendra Fadnavis : मराठी भाषा शिकली पाहिजे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मराठी भाषा शिकली पाहिजे बोलली पाहिजे याबाबत सरकारची भूमिका पक्की आहे या नि: संदिग्ध शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेचा सन्मान याविषयी सरकारची भूमिका आज विधानसभेत स्पष्ट केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते भास्कर जाधव यांनी मुंबईत घाटकोपर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी मुंबईत कोणती भाषा बोलावी याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
मुंबईत अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे असे नाही. येथे घाटकोपर विभागात गुजराती भाषिक जास्त राहातात, असे विधान जोशी यांनी केले. हे मराठीचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा याविषयी शासनाची भूमिका काय याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी आग्रही मागणी यावेळी जाधव यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, सरकारची भूमिका पक्की आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मात्र अन्य भाषेचाही आम्ही सन्मान करतो. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करू शकतो, तोच इतरांच्या भाषेवर प्रेम करू शकतो. महाराष्ट्रात राहणार्यांनी मराठी शिकले पाहिजे. महाराष्ट्रात राहणार्यांना मराठी आले पाहिजे. भैय्याजी जोशी यांचेही याविषयी दुमत असेल, असे नाही.





