मराठी भाषा गौरव दिन : ‘मराठी’चे महत्त्व आणखी वाढावे

पुणे – “अधिकाधिक विद्यार्थ्यांनी मराठीतच शिक्षण घ्यावे. मुलांना मराठी शाळेत प्रवेश देण्यासाठी पालकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. शासनाने केवळ निर्णय घेऊन आदेश काढण्याऐवजी त्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात. मराठी भाषेतून अधिकाधिक नवनवीन साहित्याची निर्मितीची झाली पाहिजे,’ अशा अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. याबद्दल “प्रभात’ने जाणून घेतलेली मान्यवरांची मते.
मराठीतून शिक्षणाची सक्ती केली असली, तरी त्याची सर्वच स्तरातून प्रभावी अंमलबजावणी व्हावी. मराठीतील साहित्य सर्वांपर्यत पोहचले पाहिजे. वाचक वर्ग वाढण्याची गरज आहे. मुलांमध्ये मराठी या मातृभाषेची अधिकाधिक आवड निर्माण करायला हवी आहे. पालकांनीही आपल्या मुलांना मराठी भाषेतूनच शिक्षण द्यायला प्राधान्य द्यावे.
– मंजूषा खेडकर, मुख्याध्यापिका, मा.स.गोळवलकर गुरुजी पूर्व व प्राथमिक शाळा
मराठी या मातृभाषेचे महत्त्व प्रत्येकाने टिकवलेच पाहिजे. या भाषेत वाचन-लिखाण अधिक करुन ते साहित्याच्या रुपाने सर्वांपर्यंत पोहचवण्याची आवश्यकता आहे. बोलीभाषेतही मराठीचाच अधिक वापर व्हावा.
– दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
राज्य शासनाने केवळ मराठी भाषेच्या विकासासाठी ध्येय-धोरणे आखून सक्ती करण्याऐवजी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषा आणखी पुढे आणण्यासाठी सक्रियपणे कार्यही झाले पाहिजे. त्याबाबतची जनजागृती करण्यात सर्वांनीच योगदान द्यायला पाहिजे. पालकांचा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्याकडे अजूनही खूप कल असल्याचे आढळून येते. हा कल मराठी भाषेतील शिक्षणाकडे वाढवावायला पाहिजे.
– शिवाजी खांडेकर, महासचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ
मराठीचा प्रत्येकालाच अभिमान असला पाहिजे. या भाषेची संकल्पना अधिकाधिकपणे रुजविण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेतून घेतल्यास ज्ञान, आकलन, समज चांगल्या पद्धतीने होते. मराठीतील साहित्य निर्मितीतही आणखी वाढ व्हावी आहे. पालकांनीही मुलांचा मराठी भाषेतील शिक्षणाकडे कल वाढवायला पाहिजे.
– दिनकर पाटील, संचालक, बालभारती





