Vinod Kulkarni : साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! विनोद कुलकर्णी यांना राज्य शासनाचा ‘हा’ प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
Vinod Kulkarni : मराठीला 'अभिजात' दर्जा मिळवण्यासाठीचा पाठपुरावा आणि बा. सी. मर्ढेकरांच्या वारसा जपण्याचे फळ; २७ फेब्रुवारीला मुंबईत होणार वितरण.

Vinod Kulkarni – मसाप, पुणे, शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणारे, युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या घरांचे नूतनीकरण करुन स्मारकात रुपांतर करणारे,
मराठी भाषेसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे आणि साता-यात तब्बल 32 वर्षानंतर 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणारे मसाप, पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.
मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे 27 फेब्रुवारीला या पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे. मराठी भाषेला असेच प्रवाही ठेवण्याचे कार्य सातत्याने करणा-या व्यक्तीस प्रतिवर्षी मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.
विनोद कुलकर्णी यांनी 15 वर्षापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना केली. शाहूपुरी शाखा स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु केला. मराठी भाषा दिन साजरा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. सलग 14 वर्षे मराठी भाषा पंधरवडा सुरु ठेवला. साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्याला देणगी देण्याचा पायंडा पाडला.
अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या पडझड झालेल्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या घराचे नूतनीकरण केले आणि त्याचे स्मारकात रुपांतर केले. ‘‘मोठ्या बँकेची छोटी गोष्ट’ हे पुस्तके लिहिले. कवी बा.सी.मर्ढेकर यांचे चरित्र लेखन केले असून ते पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.कुलकर्णी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.



