Sabar Bonda : मराठी चित्रपट सबर बोंडाला सुदानी फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : सबर बोंडा या मराठी चित्रपटाला सुदान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रॅन्ड ज्युरी प्राईजने सन्मानित करण्यात आले आहे. रोहन परशुराम कानावाडा या नवोदित दिग्दर्शकाची ही पहिलीच कलाकृती आहे. शुक्रवारी संध्याकाळी या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर त्यांच्या ताज्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली.
महाराष्ट्रातल्या अहमदनगर अर्थात आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील एका खेड्यातील समलिंगी प्रेमकहाणी असलेल्या सबर बोंडा या चित्रपटामध्ये भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅक्टस पीअर्स या नावाने हा चित्रपट इंग्रजीमध्ये देखील तयार करण्यात आला आहे.
वर्ल्ड सिनेमा ड्रॅमॅटिक कॉम्पिटीशनच्या ज्युरीमध्ये चित्रपट समीक्षक अवा काहेन, केनियाचे चित्रपट निर्माते वानुरी काहिउ आणि ऑस्कर विजेते ब्रिटिश अभिनेता डॅनियल कालुया यांचा समावेश होता. त्यांच्या प्रशस्तिपत्रात, ज्युरीने सबर बोंडाचे वर्णन महान आधुनिक प्रेमकथा असे केले आहे.
हा चित्रपट भारत, ब्रिटन आणि कॅनडा यांनी सह-निर्मिती केला आहे. नीरज चुरी, मोहम्मद खाकी, कौशिक रे, हरीश रेड्डीपल्ली, नरेन चंदावरकर आणि सिद्धार्थ मीर यांनी त्याची निर्मिती केली आहे.





