Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर; ब्रिटनच्या संसदेत तीन पुरस्काराने होणार सन्मान
Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे काल मंगळवारी लंडनला रवाना

Eknath Shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांना तीन पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे हे मंगळवारी लंडनला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी शिंदे यांना हा बहुमान दिला जाणार असल्याचे निमंत्रकांनी म्हटले आहे. याकरिता एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील तीन प्रमुख कल्याणकारी योजनांची विशेष दखल या सन्मानासाठी घेतली आहे.
तीन प्रमुख कल्याणकारी योजनांची विशेष दखल
यात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आणि तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व रोजगार मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा समावेश आहे.
तीन पुरस्कारांनी सन्मान
ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस् मध्ये एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. तर ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026’ मध्ये त्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. Eknath Shinde
दरम्यान, यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा पार पडणार आहे.
तर उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर द राइट ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण पाठवले आहे.
यावेळी महाराष्ट्र हे भारताचे प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र असल्याने, परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि भारत-यूके आर्थिक संबंधांविषयीचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, महाराष्ट्रातील नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या गतिमान कामगिरीबाबत या परिषदेत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सत्कारही केला जाणार आहे. Eknath Shinde
हेही वाचा:
Pune District : वाघोली-केसनंद-लोणीकंदच्या वाहतूक कोंडीवर नागरिक आक्रमक





