Maratha Reservation : मनोज जरांगे यांना अशक्तपणा; डॉक्टरांनी पुन्हा वैद्यकीय तपासणी केली

Maratha Reservation – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. त्यातच रविवारपासून त्यांनी पाणीही सोडले आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी १ वाजता डॉक्टरांच्या तुकडीने जरांगे यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम असली तर त्यांचा रक्तदाब कमी झाला असून अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. ते २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा सोमवारी चौथा दिवस आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांनी काहीही खाल्ले नाही. त्यातच रविवारपासून त्यांनी पाणीही सोडले आहे.
त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार रविवारी मध्यरात्री १२ वाजता मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी दुपारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांच्या तुकडीने जरांगे यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचे रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले.




