मराठा समाजाने ‘ईडब्लूएस’चा लाभ घ्यावा ! ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – राज्यातील ओबीसी नेत्यांनी (obc leader) एका सुरात मराठा समाजाला ओबीसी (OBC) कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी मराठा आरक्षणाचा पोपट केव्हाच मेल्याचा दावा केल्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.
सर्व ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात एकवटले आहेत. स्वतः भुजबळ यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत हे ओबीसींना त्यांच्याच आरक्षणातून बाजूला सारण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मराठा समाज मागसलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पोपट केव्हाच मेला आहे. आता मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकांमधून आरक्षण घ्यावे. हाच एकमेव पर्याय त्यांच्यापुढे आहे. त्यांनी हा पर्याय स्वीकारला तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होणार नाही. राज्यात ओबीसींची लोकसंख्या 32 टक्के आहे. या 32 टक्क्यांत कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आदी जाती आहेत. यातून हे वजा केले तर मराठा समाजाची संख्या किती राहते? त्यामुळे या प्रकरणी सर्वांनी समंजस भूमिका घेण्याची गरज आहे, असेही शेंडगेंनी पुढे म्हटले आहे.
सरकारने या प्रकरणी सरसकट कुणबी (kunabi) नोंदी देण्यास सुरुवात केली तर ओबीसींपुढे रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही, असा इशाराही शेंडगे यांनी या प्रकरणी दिला.





