‘मी थोड्या दिवसांचा पाहुणा…’, मनोज जरांगे यांच्या भावुक विधानाने मराठा समाज हेलावला

Narayangadh Dussehra gathering: मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक लढ्यातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नारायणगड येथील दसरा मेळाव्यातील एका भावुक विधानाने उपस्थित हजारो मराठा बांधवांचे डोळे पाणावले. प्रकृती अस्वस्थ असतानाही हातात सलाईनची सुई घेऊन मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या जरांगे पाटील यांनी ‘मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे’ असा शब्द उच्चारताच मंचावर आणि मैदानावर सन्नाटा पसरला. आरक्षण मिळाल्यानंतरही समाजाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी मुंबईला जाण्याची आणि लढा चालू ठेवण्याची जोरदार हाक दिली. दसऱ्याच्या विजय मुहूर्तावर हा मेळावा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नव्या लढ्याची सुरुवात ठरला.
मराठा आरक्षण मिळाल्यावर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात हजारो समर्थक उपस्थित होते. नारायणगडाच्या कुशीत दुपारी या कार्यक्रमात जरांगे यांनी मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनण्याचे आवाहन केले. ‘मी फक्त थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, आणि आपण मुंबईला जायची हाक दिली. कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करू द्या, मुंबईला चला. कारण, मी त्याचवेळी एक गोष्ट सांगितली होती. मी आहे तोपर्यंत, माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं आहे. मागे कुणी हटू नका, कुणी मागे सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका. तुम्ही आत्ताच साथ दिली तर मी माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण करू शकतो,’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांना भावुक केले.
आरक्षणाच्या यशाबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, ‘तुम्ही मुंबईला साथ दिली आणि ७५ वर्षात मराठ्यांनी जीआर घेऊन लढाई जिंकली. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो की लई दिवसाचा, मला त्याची चिंता नाही. कारण जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी सिद्ध केलं आहे. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता, तो होरपळताना बघवला जात नव्हता. मी कधी नाटक केलं नाही, मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. एक गोष्ट खरी आहे की, एखाद्यावेळी एक-दोन पाऊलं मागे-पुढे सरकवले. एखाद्यावेळी चूक पण झाली असेल, पण मला दिसत होतं, समाज तडफडतो आहे. लेकीबाळी, पोरंबाळं जर मोठं करायचं असेल तर, शेतीबरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं आहे. आम्ही रात्रंदिवस तुटून पडलो. माझ्या समाजाची इच्छा होती. त्याच्या मुलांना नोकरीपासून आणि शिक्षणापासून लांब राहायला लागू नये.’
आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांच्या ओल्या दुष्काळासारख्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याची घोषणा करत जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षणात सामावण्याचीही इच्छा बोलून दाखवली. ‘आपल्याला जे मिळालं ते खूप मिळालं, समाधानी राहत जा. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर सर्व आणलं आहे. थोडं हुशारीनं चला, खाताना विचार करा, गरम आहे की गार आहे. मराठ्यांनी यापुढे शासक बनायचं आणि प्रशासक बनायचं. शासक बनलात तर कुणाला मागायची गरज नाही पडणार. जातीला सांभाळायचं असेल तर, तुम्हाला शासक बनावं लागेल. प्रशासनामध्ये एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभं राहावं लागतं,’ असे आवाहन करत त्यांनी मेळाव्याला उत्साही वळण दिले.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे कार्यक्रम शांततेने पार पडला. आरक्षण मिळाल्यानंतर हा मेळावा मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरला असून, यापुढील लढ्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. दरम्यान, जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय टीम सतर्क आहे.





