मुंबईत तणाव..! मराठा आंदोलनादरम्यान तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maratha Arakshan : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठा धक्का बसला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या एका मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजय घोगरे असं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
विजय घोगरे हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने आंदोलकांमध्ये शोककळा पसरली असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा आणि आरोग्य सुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय घोगरे हे मराठवाड्यातून मुंबईत आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. आझाद मैदानावर लाखो मराठा आंदोलकांची गर्दी असताना, घोगरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ वैद्यकीय मदत करण्यात आली, मात्र त्यांचा मृत्यू टाळता आला नाही.
ही घटना आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी घडली असून, मराठा समाजात संताप आणि शोकाची लाट उसळली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले.
मराठा आरक्षण आंदोलनाने मुंबईत धुमाकूळ घातला असून, आजाद मैदान, सीएसएमटी आणि आजूबाजूच्या भागात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. हजारो आंदोलक मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबई पोलिसांनी १,५०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन अधिक कठीण झाले आहे. आंदोलकांना पाणी, शौचालय आणि इतर सुविधांबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे विजय घोगरे यांच्या मृत्यूने हा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे.





