Manoj Jarange : “आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश”; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी, एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन आपल्याला व आंदोलनाला सहकार्य न करण्याचे निर्देश दिले होते, असा दावा केला. कॅबिनेट ही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी असते, मात्र एकनाथ शिंदे यांनी माझ्याविरोधात आधीच बैठक घेतली आणि मंत्र्यांना आमच्याशी भेटू नका, आमच्यावर नोटीसा बजावा आणि सहकार्य करू नका असे आदेश दिले, असा गंभीर आरोप जरांगे (Manoj Jarange) यांनी केला.
सत्तेत असलेल्या नेत्यांवर निशाणा साधत जरांगे म्हणाले की, हे लोक आता कारवाई करत आहेत, पण मराठा समाज २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत याचा बदला घेईल. आगामी निवडणुकीत मराठा समाज मंत्री, खासदार आणि आमदारांना नक्की पाडेल.
आपल्या किंवा मराठा बांधवांवरील इन्कम टॅक्स किंवा इतर चौकशांबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही कोणाच्याही चौकशांना घाबरत नाही. पण ज्यांना आम्ही सत्तेत बसवले, तेच आज आमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्यांवर चौकशा लावत आहेत. वेळ बदलणार आहे, हे नेत्यांनी लक्षात ठेवावे.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी आणि फारसी लिपी वाचणाऱ्या तज्ज्ञांनी पुढे येऊन राज्य सरकारला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत त्यांना मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे त्यांनी (Manoj Jarange) नमूद केले.






