Jalna News : संतापजनक.! जालन्यात ३ वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून केला अत्याचार
२६ वर्षीय नराधमाने ३ वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jalna News – महाराष्ट्रातील जालना शहरात एका २६ वर्षीय नराधमाने ३ वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.
पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी घडली. पीडित चिमुरडी तिच्या घराबाहेर खेळत होती. आरोपीने आधी त्या परिसराची रेकी (निरीक्षण) केली आणि तिथे लहान मुलगी खेळत असल्याचे पाहिले. (Jalna News)
त्यानंतर तो दुचाकीवरून पुन्हा तिथे आला आणि मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून स्वतःसोबत घेऊन गेला. एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला.
या क्रूर कृत्यानंतर आरोपीने मुलीला पुन्हा तिच्या घराबाहेर सोडून पळ काढला. मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. गुरुवारी आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे जालना परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.





