Satara । नीरा नदीवरील गीते वस्तीसह अनेक बंधारे कोरडे, शेतकरी चिंताग्रस्त

फलटण, – फलटण व बारामती तालुक्यांमधील शेतकर्यांना वरदान ठरलेले नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोरडे पडले आहेत. गोखळी-मेखळीनजीक गीते वस्ती येथील बंधार्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने, पाणी गळती होऊन बंधारा कोरडा पडला आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके कशी जगवायची, याची चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
या बंधार्यावर फलटण तालुक्यातील गोखळी आणि बारामती तालुक्यातील मेखळी परिसरातील शेती अवलंबून आहेत. सध्या शेतात ऊस कापूस, फळभाज्या, पालेभाज्या आदी पिके आहेत. कापूस काढून गहू, हरभरा पेरणी करायची आहेत. मात्र, पाणी नसेल, तर पेरणी कशी करणार, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. बंधार्यात पाणी अडवताना पाटबंधारे विभागाने शेवटच्या बंधारा भरल्यानंतर वरचा बंधारा भरणे आवश्यक आहे. वरच्या बंधार्यात पाणी अडवल्यास, खालच्या बंधार्यात पाणी कोठून येणार? सध्या धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद आहे. नदीकाठच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बागायती क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने, नदीची पाणी पातळी कमी होत आहे.
बंधारे अडवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे गीते वस्ती बंधारा कोरडा राहिला आहे. गतवर्षी या बंधार्याची दुरुस्ती करण्यात आली, पण काम निकृष्ट झाल्याने त्यात पाणी राहत नाही. गळती मोठी आहे. नवीन सोनगाव बराज अडवून गतवर्षी हा बंधारा भरण्यात आला होता. प्रशासनाने काल, परवा तात्पुरती डागडुजी केली आहे. मात्र, तोपर्यंत नदीचा प्रवाह थांबला. पावसाळा संपल्याने शेतीला पाण्याची गरज आहे. त्यामुळे हा बंधारा भरुन घ्यावा, अशी मागणी लाभधारक शेतकर्यांकडून होत आहे.
या बंधार्याच्या वरच्या बाजूला असलेले घाडगेवाडी, नीरा, वागज हे बंधारेदेखील भरलेले नाहीत. पाणी उपसा सुरुच आहे आणि नदीतून पाणी येत नाही, अशा स्थितीत धरणातून पाणी उपलब्ध करून सर्व बंधारे भरले, तरच शेतकर्यांना रब्बी पिके घेता येतील. पूर्वी कालव्याचे रोटेशन लवकर मिळत होते; परंतु गेल्या चार-पाच वर्षांत नीरा उजव्या व डाव्या कालव्यांमधून फक्त चार किंवा अपवादाने पाच पाणी पाळ्या मिळत आहेत. त्यामुळे ऊस टिकत नाही. शेतकर्यांनी प्रसंगी कर्ज काढून चार-पाच किमी पाइपलाइन केल्या आहेत. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. आता तातडीने बंधारा भरून उभी पिके वाचवावीत आणि रब्बी पिकांच्या नियोजनासाठी पाणी द्यावे, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.





