हेमंत महाजन
रशिया-युक्रेन या युद्धामधील एक वेगळा महत्त्वाचा पैलू म्हणजे माहिती युद्ध किंवा मानसिक युद्ध. हे युद्ध क्रिकेट मॅचसारखे सतत टीव्हीवर दाखवले जात आहे. युद्ध सुरू असतानासुद्धा मानसिक युद्ध मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
रशिया माहिती युद्ध किंवा मानसिक युद्ध करण्याची प्रचंड क्षमता असलेले राष्ट्र समजले जाते. अमेरिका, युरोप आणि नाटोसुद्धा माहिती युद्धामध्ये माहीर आहे. आतापर्यंत चाललेल्या माहिती युद्धामध्ये नेमके काय केले गेले? याचा जनतेवर, सैन्यावर, सामान्य जनतेवर आणि जागतिक मतावर काय परिणाम झाला आहे? या मध्ये कोण जिंकले आणि कोण हरले?
रशियाचे माहिती युद्ध
रशियाच्या माहिती युद्धामध्ये डिपफेक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. कॉम्प्युटरच्या मदतीने तयार केलेली खोटी ऑपरेशन्स, जी प्रत्यक्ष झालेली नाहीत हे दाखवत राहायची. असे दाखवायचे की रशिया आपल्यावर हल्ला करणार आहे. उद्देश होता युक्रेनच्या जनतेला घाबरून टाकायचे की ज्यामुळे ते देशाच्या सरकारच्या विरोधात जातील परंतु तसे झाले नाही. याचा उलटा परिणाम झाला आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे युक्रेनचे हिरो बनले.
डिपफेक टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून रशियाच्या बाजूने असलेली खोटी चित्रे, ग्राफिक्स, वेगळ्या विषयावर लेख, फोटोज् टाकले जातात. युद्धाची माहिती मिळवण्याकरिता माध्यमे शोध घेत असतात त्यांना प्रचंड प्रमाणात अशा प्रकारची माहिती मिळते. रशियाने सायबर जगतामध्ये आपल्या सीमेवर सैन्याच्या जमवाजमवीचे शेकडो व्हिडिओ टाकले. रशियाला टिकटॉक किंवा इतर सोशल मीडियावर आक्रमक कारवाई करताना मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले.
असे दाखवण्यात आले की बेलारूसमधल्या केवळ स्वातंत्र्य लढ्याला रशियाने मदत केली. जी दोन राज्य युक्रेनपासून वेगळी झाली ती सुद्धा स्वत:हून वेगळे होण्याला मागत होती. रशियन सैन्य या लढाईला केवळ एक स्पेशल ऑपरेशन म्हणते. दाखवण्यात असे येते आहे की केवळ युक्रेनमध्ये असलेल्या नाखूश लोकांना मदत करण्याकरिता रशियन सैन्य हे तिथे पोहोचलेले आहे. याशिवाय अनेक लेख, अनेक व्हिडिओ या विषयावर टाकण्यात आले.
युक्रेनकडूनही माहिती युद्धाचा वापर
युक्रेनचे इंटरनेट बॉम्ब हल्ला करून बरबाद करण्यात आले. त्यावेळेला ऍलन मस्क यांनी सॅटेलाइटच्या मदतीने युक्रेनला इंटरनेट दिले, ज्यामुळे युक्रेन मानसिक युद्धात रशियाचा जोरदार मुकाबला करत आहे. युक्रेनने दाखवले की नेक आयर्लंडवर त्यांच्या 12 सैनिकांनी रशियाच्या सैन्याशी लढा दिला. दाखवण्यात आले की युक्रेनचे शूर सैनिक सामान्य नागरिकही लढाईकरिता तयार आहेत. परंतु 20 लाखांहून जास्त नागरिकांनी युक्रेन सोडलेले आहे. युक्रेनच्या अध्यक्षांना पुनःपुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्यात आले. असे फोटो दाखवण्यात आले की रशियन सैन्याने युक्रेनच्या हॉस्पिटलवर हल्ला केला, रशियन हल्ल्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुले मारली गेली.
रशिया त्यांच्या विरुद्ध प्रचंड मोठा बॉम्ब वापरत आहे असे म्हटले. यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
परंतु ते नक्कीच खरे नसावे. युक्रेनने अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की रशियाने युक्रेनच्या न्युक्लियर रिएक्टरवर हल्ला केला. त्यामुळे तिथे न्युुक्लिअर बॉम्बस्फोट होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या जगाची काळजी वाढली. युक्रेनने पकडलेल्या रशियन सैनिकांच्या मुलाखती टीव्हीवर प्रकाशित केल्या. जिथे रशियन सैनिक सांगत होते की आम्हाला या लढाईमध्ये यायचे नव्हते. आम्ही केवळ तीन वर्षांकरिता रशियन सैन्यामध्ये आलेलो आहोत. आम्हाला न सांगता युद्धावर पाठवलेले आहे. याशिवाय रशियाचे बरबाद केलेले रणगाडे मोठ्या गाड्यांचे सुद्धा फोटो दाखवण्यात आले. हे सर्व किती खरे आहे ते सध्या कळणे शक्य नाही. रशियाने केलेल्या माहिती युद्धाचा युक्रेनवर फारसा परिणाम झालेला नाही. युक्रेनचे नेतृत्व, त्यांचे सैन्य आणि बहुतांशी नागरिक युद्ध लढत आहेत. रशिया सांगण्याचा प्रयत्न करत होता की आम्ही जे हल्ले करतो आहे ते फक्त लष्करी तळावर करतो आहे किंवा जेथून फायरिंग होते आहे तिथे करतो आहे. आम्ही कुठल्याही नागरिकांच्या घरांवर हल्ले करत नाही. जे अनेक वेळा खरे नव्हते.
माहिती युद्धाचा परिणाम काय झाला?
सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर यावरून भारतातील मीडिया पुष्कळशी माहिती गोळा करते. कारण युद्धभूमीमध्ये असलेला प्रत्येकजण आपल्या मोबाइलवर चित्रण करून ते इंटरनेटवर टाकत आहे. एवढे नक्की की जगातील सोशल मीडिया रशियाच्या विरोधात आहेत. रशियाविरुद्ध चाललेले माहिती युद्ध जे वेस्टर्न वर्ल्ड आणि युक्रेन चालवत आहे त्यांना जास्त यश मिळत आहे. जगावर याचा काय परिणाम झाला? जगामध्ये बहुतेक देश माहिती युद्धात रशियाच्या विरोधात गेलेले आहेत. युनायटेड नेशन्समध्ये झालेल्या मतदानामध्ये 143 देशांनी रशिया हल्लेखोर आहे म्हणून त्यांच्या विरोधात मतदान केले. फक्त तीनच देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केले आणि 35 देश या मतदानामध्ये तटस्थ राहिले.
याचाच अर्थ जग रशियाच्या विरोधात आहे. परंतु त्याचा रशियावर काय परिणाम होतो आहे. रशिया युद्ध थांबवेल का तर याचे उत्तर आहे, नाही. रशियाला माहिती आहे की नाटो किंवा युरोप हे फक्त माहिती युद्ध करू शकतात. परंतु प्रत्यक्ष लढाई करण्याची त्यांची क्षमता नाही. 19-20 दिवसांच्या लढाईनंतर असे म्हणता येईल की माहिती युद्ध युक्रेन आणि रशिया एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याला जगाची मीडिया आणि भारताची मीडियासुद्धा बळी पडत आहे. नेमके खरे आणि खोटे सध्या कळणे कठीण आहे. माहिती युद्धात सध्या तरी युक्रेन पुढे आहे. परंतु यामुळे रशियाचा हल्ला थांबेल आणि रशिया परत जाईल अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही.