Manoj Tiwari : लालूंच्या काळात बिहारमध्ये गुन्हेगारांचे राज्य; भाजप खासदार मनोज तिवारी यांची टीका

पाटणा : भावी मुख्यमंत्री बनू पाहणारे राजद नेते तेजस्वी यादव हे जंगल राज, जमीन घोटाळे आणि शहाबुद्दीनच्या स्तुतीशी संबंधित आहेत. जेव्हा लालूप्रसाद यादव सत्तेत होते तेव्हा बिहारमध्ये गुन्हेगारांचे राज्य होते. आजही ते त्याच विचारांची पुनरावृत्ती करत आहेत. शहाबुद्दीनची स्तुती करणारे बिहारचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असे प्रतिपादन भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केले आहे.
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, राजकीय विधाने आणि प्रति-विधानांचे तापमान वेगाने वाढत आहे. आता, भाजप खासदार आणि भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तिवारी यांनी तेजस्वी यांच्या निवडणूक आश्वासनांना केवळ पोकळ भाषण म्हणून फेटाळून लावले आहे. मनोज तिवारी यांनी अलिकडेच आरजेडीच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यामध्ये राजदच्या नेत्यांनी सरकार स्थापनेनंतर वक्फ विधेयक फाडून टाकले जाईल, असा दावा केला होता. त्यावर तिवारी म्हणाले की, हे विधान पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. वक्फ बोर्ड विधेयक संसदेत मोठ्या बहुमताने मंजूर झाले, बिहार विधानसभेत नाही. जर कोणी आता याबद्दल खोटे बोलत असेल तर भविष्यात ते जनतेला किती मोठे खोटे बोलतील याची कल्पना करा. बिहार विधानसभा संसदेत मंजोर झालेले कायदे बदलू शकत नाही.
तेजस्वींवर वैयक्तिक टीका
मनोज तिवारी यांनी तेजस्वी यादव यांच्या कुटुंबातील वादालाही राजकीय वादात ओढले. ते म्हणाले, तेजस्वी पूर्वी त्यांचा भाऊ तेजप्रताप यादव हाताळू शकले नाहीत आणि आता ते बिहारबद्दल बोलत आहेत. ज्या कुटुंबातच एकता नाही अशा कुटुंबाकडून बिहारमध्ये एकतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. जनता आता वक्तृत्वाकडे नाही तर वास्तव आकडेवारीकडे पाहत आहे.
बिहारमध्ये 175 जागांचा दावा
मनोज तिवारी यांनी दावा केला की यावेळी बिहारमध्ये एनडीएची लाट स्पष्टपणे दिसून येत आहे. आपण जितके बिहारमध्ये फिरू तितका आपला आत्मविश्वास वाढेल. जनता कंदील नव्हे तर एलईडी दिव्यांकडे वळत आहे. यावेळी, एनडीए १७५ जागा जिंकेल. जनतेने ठरवले आहे की बिहार आता जंगल राजच्या अंधारात राहणार नाही, तर विकासाच्या प्रकाशात जगेल.





