नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीत झालेला पराभव भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. कदाचित म्हणूनच, भाजप हायकमांड आता दिल्लीच्या तख्तावर बसविण्यासाठी खास चेहऱ्याचा शोध घेत आहे. सध्या, प्रदेशाध्यक्ष पदासाठी मनोज तिवारी आणि प्रवेश वर्मा यांच्यात स्पर्धा लागली आहे. परंतु, माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या नावाची सुध्दा चर्चा आहे.
Pakistan : पाकिस्तानातील माजी मंत्र्याच्या मुलाला ‘या’ प्रकरणी फाशीची शिक्षा
भाजपातील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली प्रदेश कार्यकारणीत लवकरच खूप मोठा बदल केला जाणार आहे. 2024 मधील लोकसभा आणि त्यानंतर 2025 मध्ये होणारी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महानगर पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने भाजप हायकमांडचे धाबे दणाणले आहे.
दिल्लीची प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी महानगर पालिकेच्या झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. सध्या, उपाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले आहे. परंतु, भाजप हायकमांड प्रदेशाध्यक्षपदासाठी अशा एका चेहऱ्याचा शोध घेत आहे जो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सामना करू शकेल.
सूत्रांनुसार, 15 जानेवारीपूर्वी दिल्लीच्या कार्यकारणीत मोठा बदल बघायला मिळू शकतो. सध्या, भोजपुरी चित्रपटातील हिरो खासदार मनोज तिवारी आणि माजी मुख्यमंत्री स्व. साहिबसिंग वर्मा यांचे चिरंजीव खासदार प्रवेश वर्मा यांच्या नावाची भावी अध्यक्ष म्हणून सर्वाधिक चर्चा सुरू आहे. परंतु, माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या नावाची सुध्दा चर्चा आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनोज तिवारी यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना चांगले यश आले होते. तर, प्रवेश वर्मा यांच्या मतदारसंघात भाजपला फटका बसला होता, हे विशेष.