मनोज सौनिक यांनी स्वीकारला ‘महारेरा’चा पदभार

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज मंत्रालयात श्री. सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, माजी सदस्य एस. एस. संधू, महारेराचे मावळते अध्यक्ष अजोय मेहता तसेच गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महारेरा काय आहे?
भारत सरकारने दिनांक 1 मे 2017 रोजी स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) प्राधिकरण अधिनियम 2016 कार्यान्वित केला. स्थावर संपदा नियामक क्षेत्रात अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व, वित्तीय शिस्त, तक्रारींचे वेगाने निराकरण व्हावे व सदर क्षेत्र हे गृह खरेदीदार / वाटपग्राही केन्द्री असण्याचे सदर अधिनियमाचे मूळ उद्दिष्ट आहे.
राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राच्या नियामक व प्रवर्तन प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 मार्च 2017 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 23 अन्वये महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची ( महारेरा ) स्थापना केली.
कालांतराने दमण दिव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासाठी देखील महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची नियामक प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रत्येक हितसंबंधीयाच्या हिताचे संरक्षण करून विश्वास आणि आत्मविश्वास स्थापित होऊन स्थावर संपदा क्षेत्राचे एका पारदर्शक व व्यावसायिक क्षेत्रात रुपांतरीत करण्याचे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण हे अधिनियमाची शब्दशः व मतितार्थानुसार कार्यक्षम अंमलबजावणी करण्यासाठी झटत असून त्यातील तरतुदींचे अनुपालनाची खातरजमा करून, पारदर्शकता, उत्तरदायित्व, वित्तीय अनुशासन व गृह खरेदीदार / वाटपग्राही केन्द्री असण्याची खबरदारी घेत आहे.
मूळ जबाबदाऱ्या-
-प्रवर्तकांनी स्थावर संपदा प्रकल्पाबाबत सर्व प्रकटने़ सादर केल्याची खातरजमा करणे.
-स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी
-स्थावर संपदा अभिकर्त्यांची नोंदणी
– प्रकल्पात दुरुस्ती
-प्रकल्पास मुदतवाढ
– तक्रारींचे निराकरण
– स्थावर संपदा क्षेत्राच्या विकसन व प्रवर्तनाशी संबंधित सर्व बाबींवर यथोचित शासनास शिफारशी करणे
महारेराचे अधिकृत संकेतस्थळ – https://maharera.maharashtra.gov.in/





