Manoj Jarange Patil : “मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो…’ – मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil in Mumbai : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह आज लोणावळा येथे पोहोचले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर जरांगे यांचे आंदोलन नियोजित आहे. मात्र पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे जरांगे लोणावळ्यात पोहोचले असतानाच, दुसरीकडे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने पुढं काय होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत भाष्य केलं आहे. लोणावळ्याहून मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली.
या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याबाबत विचारले असता, कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे, पण जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला आहे, आम्ही मुंबईकडे जात आहोत, असं जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत, असंही ते म्हणाले.
पोलिसांनी सुचवलं पर्यायी मैदान –
आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी आझाद मैदान येथील परवानगी नाकारली आहे. मैदान छोटं असून आंदोलनासाठी योग्य नसल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे. मुंबई पोलीस यांनी या आंदोलनासाठी खारघर येथील मैदान सुचवले असल्याचं वृत्त आहे.





