Manoj Jarange : यंदा मनोज जरांगेंचाही होणार दसरा मेळावा; मेळाव्यात कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही

Manoj Jarange – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी गेल्या १२-१३ महिन्यांत सहा वेळा उपोषण केले. नुकतेच त्यांनी नऊ दिवस उपोषण केले. त्यानंतर प्रकृती खालवल्यामुळे ते येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, ते बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.
बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायणगडावर 175 एकर मैदानात हा मेळावा होणार आहे. मराठा समाजासोबतच शेतकरी, कष्टकरी यांनीही या मेळाव्याला यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यामुळे 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दसरा मेळावा तयारीसाठी झालेल्या एका बैठकीत 20 लाख रुपये निधी जमा झाल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुस्लिम समाजाचाही पाठिंबा आहे.
त्यांनी देखील दसरा मेळाव्यासाठी निधी दिला आहे. मराठा समाजातील तरुण दसरा मेळाव्यासाठी उत्सूक आहे. मोठ्या संख्येने तरुण येणार आहेत. त्यांच्यासाठी मंगलकार्यालय खुले ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दसरा मेळाव्यात कोणतेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण दिले जावे. सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे आणि हैदराबाद, सातार, बॉम्बे गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
महाराष्ट्र सरकारने नुकतेच शिंदे समितीच्या शिफारसींना मान्यता दिली आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठीच्या अटींमध्ये बदल केला आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र जरांगे हे त्यांच्या मागण्यावर अडून आहेत.
विधानसभा आचारसंहितेपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा निवडणुकीत उभे राहण्याचे किंवा महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. त्यामुळे सरकार आचारसंहितेपूर्वी त्यांच्या मागण्यांचा कसा विचार करते हे पाहावे लागणार आहे.





