प्रभात वृत्तसेवा पुणे – नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सुरू असलेल्या दाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे शुक्रवारी (दि. ३१) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.आर. डोरनालपल्ले न्यायालयात हजर राहिले. त्यांनी या गुन्ह्यातून दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे, असा अर्ज केला आहे. त्यावर बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला. त्यानंतर उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून, जरांगे यांच्या वतीने ॲड. हर्षद निंबाळकर, मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. खंडेराव टाचले, ॲड. आकाश बिराजदार आणि सरकारी पक्षातर्फे ॲड. डी. सी. खोपडे काम पाहात आहेत.नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी दोषमुक्त करण्यासाठी जरांगे यांनी अर्ज केला असून, आजारपणामुळे मागील काही तारखांना ते उपस्थित नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ते उपस्थित राहिले. त्यांच्या वतीने ॲड. निंबाळकर, ॲड. शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले. या गुन्ह्यात जरांगे यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. फसवणूक करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. बुक करण्यापूर्वीच आगाऊ ५ लाख रुपये दिले आहेत, तसेच नाटकाबाबत झालेल्या करारावर त्यांनी सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना गुन्ह्यातून वगळावे, असा युक्तिवाद ॲड. निंबाळकर यांनी केला. पुढील तारखेस निंबाळकरांचा आणखी युक्तिवाद होणार असून, त्यानंतर सरकारी वकील ॲड. खोपडे आणि मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. टाचले, ॲड. बिराजदार यांचा युक्तिवाद होईल.