महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज एक महत्त्वाची घडामोडी घडली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी स्वतः सुनेत्रा पवार यांना शपथ दिली. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद झाल्या आहेत. या शपथविधीनंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या या निर्णयावर मिश्र भावना व्यक्त केल्या आणि त्यांना राजकीय परिस्थितीत सावध राहण्याचा ठाम सल्ला दिला. मनोज जरांगे म्हणाले, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे. राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही. मात्र अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता, हे स्पष्ट आहे.” ते पुढे म्हणाले, “सुनेत्रा पवार यांनी आता सर्वांना सोबत घेऊन चालावं. आता गिधाडं घिरट्या घालायला लागले आहेत, त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. अजितदादांसोबत न दिसणारे गिधाड आता दिसू लागले आहेत. सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावे.” Sunetra Pawar जरांगे यांनी असा विश्वास व्यक्त केला की, काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले असावे. त्यांनी पुढे सांगितले, “पार्थ आणि जय पवार यांना दादांनी (अजित पवार) काही सल्ला दिला असेल तर त्याचं त्यांनी पालन करावं.” दरम्यान, आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत त्यांना कोणतीही पूर्व माहिती नव्हती आणि यासंदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. या विधानावरही मनोज जरांगे पाटील यांनी तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा त्यांचा डावपेच असू शकतो, मी सांगू शकत नाही. तरीही सर्वांना घेऊन चालावं. गिधाडं आता घिरट्या घालायला लागले आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. हे ढेकण आणि गिधाडं घात करू शकतात. सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं. हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात, त्यावेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल.” मनोज जरांगे यांच्या या प्रतिक्रियेतून एक बाजू स्पष्ट होते की, सुनेत्रा पवार यांनी नव्या जबाबदारीत राजकीय सावधगिरी बाळगावी आणि पवार कुटुंबातील एकता टिकवून ठेवावी. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पक्षांतर्गत आणि कुटुंबीय स्तरावर निर्माण होणाऱ्या आव्हानांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, तर पुढील काळात या सल्ल्याचा आणि राजकीय घडामोडींचा कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.