मनोज जाधव, सुवर्णा चव्हाण यांना पदोन्नती

सातारा – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांची अकोला ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून तर सातारा तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांची चंद्रपूर येथे ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्पाच्या संचालक म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढले. तर सातारा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) चंचल पाटील यांची पदोन्नती झाली आहे.
महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील 15 अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/ प्रकल्प संचालक संवर्गात तदर्थ पदोन्नती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांची अकोला येथे प्रकल्प संचालक पदावर पदोन्नती झाली आहे. श्री. जाधव धुळदेव (ता. फलटण) गावचे रहिवाशी असून कुर्डूवाडी (सोलापूर) येथून गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ केला.
वेल्हा (जि. पुणे) येथेही त्यांनी सेवा बजावली. 6 ऑगस्ट 2019 रोजी सातारा जिल्हा परिषदेत त्यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली होती. श्री. जाधव यांनी गेल्या साडेतीन वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन शासनाने त्यांचा गुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरव केला आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वी त्यांना पेन्शन मंजूर व्हावी यासाठी तसेच जिल्हा परिषदेत कित्येक वर्षे रखडलेली अनुकंपा भरती करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
पदाधिकारी, सदस्य व प्रशासन यांच्यात समन्वय साधून त्यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्याचे काम त्यांनी केले. करोना संकटात श्री. जाधव यांनी विविध विभागांचा समन्वय साधला होता. सातारा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांची चंद्रपूर येथे प्रकल्प संचालक पदावर पदोन्नती झाली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक
सुषमा देसाई यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी चंचल पाटील यांची सोलापूर येथून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.





