नगर | काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मनोहर पोटे

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी ही निवड केली आहे.
काँग्रेस व महिला काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुक्रमे राजेंद्र व अनुराधा नागवडे यांनी पदांचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने येथील काँग्रेस खिळखिळी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपण नागवडेंसोबत राष्ट्रवादीत न जाता काँग्रेससोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी आज मनोहर पोटे यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड केली.
या निवडीबद्दल बोलताना नवनियुक्त शहराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह तालुक्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न कर. पक्षाची विचारसरणी आणि ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू.





