Manmohan Singh : अंत्यविधीवरून सुरू वादंग कायम; कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीवरून सुरू झालेले वादंग रविवारीही कायम राहिले. त्यातून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. कॉंग्रेसने केंद्र सरकारवर अनादर आणि गैरव्यवस्थापनाचा आरोप केला. तर, कॉंग्रेसकडून निराधार आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपने केला.
कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी अंत्यविधीवेळी सरकारने केलेली व्यवस्था, नियोजन आदी बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दूरदर्शन वळगता इतर कुठल्याही वृत्तसंस्थेला परवानगी देण्यात आली नाही. दूरदर्शनचा अधिकाधिक फोकस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर होता. सिंग यांच्या कुटूंबीयांचे अल्प चित्रण करण्यात आले.
सिंग यांच्या कुटूंबीयांसाठी समोरील रांगेत केवळ ३ खुर्च्या ठेवण्यात आल्या. सिंग यांच्या कन्या आणि कुटूंबातील इतर सदस्यांना खुर्च्या उपलब्ध करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांना मोठा आटापीटा करावा लागला. लष्कराच्या तिन्ही दलांनी सिंग यांना सलामी दिली.
त्यांच्या पत्नीकडे राष्ट्रध्वज सोपवण्यात आला. त्यावेळी मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांनी उभे राहण्याचे औचित्य दाखवले नाही. सामान्य जनतेला आत येण्यापासून रोखण्यात आले. जनतेला बाहेरूनच अंत्यविधी पाहावे लागले, आदी बाबींवर खेडा यांनी बोट ठेवले.
त्यावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी प्रत्युत्तर दिले. त्यातून त्यांनी खेडा यांचा प्रत्येक आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. याआधी सुद्धा केवळ दूरदर्शनने अशा प्रसंगी कव्हरेजची जबाबदारी सांभाळली. बैठक व्यवस्था दिल्ली पोलिसांशी सल्लामसलत करून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने केली.
सिंग यांच्या कुटूंबीयांसाठी ५ खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. शासकीय इतमामात अंत्यविधी झाले. पूर्ण लष्करी सन्मानात ती प्रक्रिया योग्यप्रकारे घडली. अंत्यविधीचे ठिकाण गर्दीने पूर्ण भरले होते. सुरक्षेच्या निश्चितीसाठी सुरक्षा यंत्रणांनी अधिक गर्दीला मनाई केली, असे मालवीय यांनी नमूद केले.





