Manjusha Nagpure : दूषित पाणी समस्येवर तातडीने तोडगा काढा! महापौरांचा पाणीपुरवठा विभागाला अल्टीमेटम
Manjusha Nagpure : महापौर मंजूषा नागपूरे यांच्याकडून कुरूळी येथील भामाआसखेड पंपगृह आणि जलशुद्धीकरण केंद्राची नगरसेवकांसह प्रत्यक्ष पाहणी.

Manjusha Nagpure – धानोरी, टिंगरेनगर, नागपूर चाळ, शांतीनगर, विमाननगर, वडगाव शेरी परिसरात काही आवड्यांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी येणे तसेच अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी प्रचंड तक्रारी केल्या आहेत, याची दखल घेत पालिका प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, असे आदेश महापौर मंजूषा नागपूरे यांनी दिले आहेत.
यावेळी अधिकाऱ्यांनी भामाआसखेड जलयोजनेच्या पंपगृह आणि जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करणारी चाकण-करंजविहिरे विद्युत वाहिनी वारंवार खंडित होत असल्याने पंपिंग प्रक्रिया प्रभावित होत आहे. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी जाते. मात्र, पुढे ते दूषित होत असल्याचे सांगितले. यावर महापौरांनी जलशुद्धीकरण केंद्रापासून वितरण व्यवस्थेपर्यंत संपूर्ण यंत्रणेची तपासणी करण्यात यावी.
नागरिकांच्या घरांपर्यंत विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन वैज्ञानिक तपासणी करण्यात यावी तसेच पिवळसर पाणी येण्यामागील मूळ कारण शोधून त्वरित कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. कुरूळी येथील येथील पंपगृह आणि जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी शनिवारी महापौरांनी या भागातील नगरसेवकांसह केली. नगरसेविका अश्विनी भंडारे, संगीता दांगट, रेखा टिंगरे, अनिल टिंगरे,
नंदिनी झेंडे, हर्षल टिंगरे, शितल सावंत, सुहास टिंगरे, श्रेयस खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, रामदास दाभाडे, शैलजीत बनसोडे, रत्नमाला सातव, तृप्ती भरणे, सुरेंद्र पठारे, नारायण गलांडे, श्वेता गलांडे, कविता गलांडे, योगेश मुळीक, अविनाश साळवे, सायरा शेख, अश्विनी लांडगे, विशाल मलके तसेच पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, संबंधित स्थापत्य अभियंते आणि विद्युत अभियंते यावेळी उपस्थित होते.
“स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित सर्व विभागांनी या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे, असे आदेश दिले आहेत.”
– मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे मनपा





