Manipur – बिष्णुपूर जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मणिपूरमधील परिस्थिती आव्हानात्मक आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न करणे आणि परिसरात लागू केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हेनगांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहलुप माखा लेकाई येथे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे यांगोजम बोरिश सिंग (२३), मंगसताबाम डेव्हिड सिंग (२१), पंगंबम निवास मेईतेई (२२), लैतोंजम रोमन सिंग (२२), फेरेनजम टोनी (२१) आणि निंगथौजम दानिश सिंग (२२) अशी आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तींनी केवळ निर्बंधांचे उल्लंघन केले नाही, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला. दुसरीकडे, स्फोटात प्राण गमावलेल्या दोन निष्पाप मुलांची कुटुंबे अत्यंत दुःखी आणि संतप्त आहेत. मुलांच्या आईवर सध्या राज मेडिसिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांची आजी, हिजाम लोईदाम यांनी सरकारने देऊ केलेली नुकसान भरपाई स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. राज्य सरकारने गुन्हेगारांना ओळखून पाच दिवसांच्या आत त्यांच्या नातवंडांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निष्पाप लोकांचा गुन्हा काय होता आणि त्यांना इतक्या निर्घृणपणे का मारले गेले,असे प्रश्न कुटुंबिय विचारत आहेत. संचारबंदी अंशत: शिथिल खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत, परंतु सर्वसामान्यांच्या सोयीसाठी तीन तासांची संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. या दरम्यान, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी इम्फाळमधील ख्वैरमबंद कैथल बाजारात मोठी गर्दी जमली होती. लोक अल्पावधीत शिधावाटप आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसले. प्रशासन सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.